Breaking News

सोनपेठमध्ये फुलतेय ड्रॅगन फळांची बाग; पारंपारिक पिकांना मिळाला समर्थ पर्याय सोनपेठमध्ये फुलतेय ड्रॅगन फळांची बाग; पारंपारिक पिकांना मिळाला समर्थ पर्याय

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

विशेष प्रतिनिधी ः
सोनपेठ तालुका पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणूून ओळख असलेल्या या तालुक्यातील एका शेतकऱ्याने विदेशी असलेल्या ड्रॅगन फळांची लागवड केली असून, पारंपरिक शेतीला पर्याय शोधला आहे.

सोनपेठ येथील डॉ. प्रकाश पवार यांनी ही बाग विकसित केली आहे. विदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मकच असते. जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या डॉ. प्रकाश पवार यांनी दीड एकर क्षेत्रात परदेशी फळांची लागवड केली आहे. डॉ. पवार हे कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गेले होेते. त्याठिकाणी त्यांनी ड्रॅगन फळांची बाग बघितली. आपल्या तालुक्यातही ही बाग फुलविता येईल का? या विचाराने त्यांनी या फळांची चार रोपे लावली आणि ती शेतात लावली. तेव्हा ही झाडे चांगल्या पद्धतीने आली. यानंतर यू-ट्यूबवरून ड्रॅगन फळ व रोपांची माहिती घेतली. औरंगाबाद जिल्ह्यातील मिर्झापूर येथे रमेश पोकर्णा यांच्या बागेची त्यांनी पाहणी केली. याच ठिकाणी ८० रुपयांना एक याप्रमाणे २,४०० रोपांची खरेदी केली. त्यापैकी २ हजार रोेपे बाहेरून लाल व आतून पांढरे गर असलेली आहेत, तर ४०० रोपे दोन्ही बाजूंनी लाल अशी आहेत.

या बागेसाठी एकरी अडीच लाख रुपये खर्च आला असून, अंदाजे ६ टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. या पिकाची फळेही फुलधारणेनंतर ३० ते ५० दिवसांमध्ये तयार होतात. वर्षाकाठी चांगले व्यवस्थापन असल्यास ५ ते ६ वेळा काढणी करणे शक्य आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. या शेतीसाठी पवार यांना मंडळ अधिकारी समीर वाळके यांचे मार्गदर्शन लाभले.

ड्रॅगन फळ हे निवडुंग कुळातील असून, अमेरिका खंडात उगम पावलेले आहे. इस्रायल, थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंका या देशांत या फळांची मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या शेती गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या फळांनी भारत देशातही गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रवेश केला असून, यांची लागवड यशस्वी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे फळ खुणावत आहे. ज्वारीचे कोठार व पांढरे सोने पिकविणारा तालुका, अशी ओळख असलेल्या या तालुक्यात डॉ. प्रकाश पवार यांनी ड्रॅगन फळांची शेती यशस्वी केली आहे.

दोन वर्षांपूर्वी डॉ. पवार यांनी ड्रॅगन फळांची लागवड केली. या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले असून, आता फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. एक फळ ३०० ते ७०० ग्रॅम वजनाचे आहे. या फळांना बाजारपेठेत मोठी मागणी असून, ६० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो.

डेंग्यूचा आजार तसेच इतर आजारामध्ये कमी झालेल्या व्यक्तीच्या रक्तामधील पेशी वाढविण्याचे काम हे फळ करते, असे डॉ. पवार यांनी सांगितले. ड्रॅगन फळ पिकल्यानंतर तोडणे अपेक्षित आहे. या फळाभोवती वेलीचे काटे असल्याने फळ कापण्यासाठी विशिष्ट प्रकारची कात्री वापरली जाते. मराठवाड्यातील हवामानात ड्रॅगन शेती शक्य असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close