विकास कामांना प्राधान्याने गती देण्यात यावी – विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर झरी येथे शिक्षण झालेल्या सुनिल केंद्रेकर यांच्याकडून परभणी जिल्हा आशावादी

संपादक :- अकबर सिद्दिकी
परभणी, दि. 21 – परभणी जिल्हयातील विविध विकासकामांचा आढावा घेत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सर्व शासकीय यंत्रणांना विकासकामांना प्राधान्याने गती देण्याचे निर्देश दिले.
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आज परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकूश पिनाटे प्रकल्प संचालक प्रताप सवडे, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आयुक्तांनी आढावा घेतला. मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी करावयाच्या सर्व सोई सुविधा झाल्या की नाही याची खातरजमा निवडणूक अधिका-यांनी करावी मतदान केंद्रातील रॅम्पची व्यवस्था महानगर पालिका, नगर पालिका, आणि जिल्हा परिषदेने करावी. स्वच्छतागृह प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहेत. विद्युत व्यस्था पुरेशी आणि अंखंडीत राहणेआवश्यक आहे. पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पुरविणे आवश्यक असल्याचे सांगतांनाच केंद्रेकर यांनी मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि शासकीय कर्मचा-यांना प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्राची निश्चिती निवडणूक आयोगाच्या निकषानुसार करण्यात यावी असे सांगून त्यांनी निवडणूका निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कामाचा आढावा घेतांना कमी नोंदणी झाल्याबाबत असमाधान व्यक्त करीत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिका-यांनी जास्तीत जास्त गतीने नाव नोंदणीचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले.
कामचुकारपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही यावेळी विभागीय आयुक्त म्हणाले.
जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊन विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी बंधारे व धरणांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले जलसंपदा विभागाची व जलसंधारणची कामे तात्काळ पूर्ण करण्याचेही त्यांनी सुचित केले. पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय यंत्रणांनी पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याविषयी तालुकानिहाय आढावा घेतला. परभणी शहरातील 13 दिवसाला होणारा नळाद्वारे पाणी पुरवठा योग्य नसल्याचे सांगून त्यांनी लवकरात लवकर सुधारणा करण्या विषयी सुचना केल्या. यावेळी त्यांनी वाळु लिलाव, रस्ते विकास पशुसंर्धन आदि कामांचा आढावा घेऊन उपयुक्त सुचना केल्या. वृक्षारोपणाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या तसेच प्लॉस्टीक बंदीचा निर्णय प्रभावीपणे राबविला जाईल याची महानगर पालिका, नगर पालिकेने दक्षता घ्यावी. ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा जमा करुन विल्हेवाट लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी अधिका-यांच्या अडचणीही समजावून घेतल्या.