विज्ञानातील गमती जमती चा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव*

संपादक :- अकबर सिद्दिकी
*गंगाखेड (प्रतिनिधी)* गंगाखेड – लोहा रोडवर गंगाखेड पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेले पालम तालुक्यातील सामाजिक, आर्थिक विकास संस्था, केरवाडी (स्वप्नभूमी) संचलित ‘डिस्कव्हरी सायन्स सेंटर’ ला शहरातील सरस्वती विद्यालयाच्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी भेट देऊन विज्ञानातील गमती जमती चा अनुभव घेतला. इयत्ता आठवी, नववी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात असलेल्या क्षेत्रभेट या प्रकल्पाअंतर्गत ही भेट देण्यात आली .यावेळी डिस्कव्हरी सायन्स सेंटरचे प्रमुख वीरभद्र देशमुख व विष्णू पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणच्या सर्व प्रयोगांची माहिती दिली. यामध्ये वार्यापासून, पाण्यापासून वीजनिर्मिती करणे, दिवस व रात्र कसे होतात, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आवर्तसारणी, मानवी शरीर, पदार्थांच्या अवस्था, तसेच आर्किमिडीजचे तत्व ,मानवी दृष्टीभ्रम, ऊर्जेच्या वेगवेगळ्या अवस्था, पाण्याचा प्रष्टीयताण, आम्ल-आम्लारी, प्रकाश यावरचे अनेक प्रयोग याविषयीची विद्यार्थ्यांना माहिती दिली व ते प्रत्यक्ष हाताळण्याची संधी दिली. तसेच याठिकाणचे विशेष आकर्षण म्हणजे तारांगण या कार्यक्रमांतर्गत आकाशातील ग्रह, तारे ,चंद्र पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला. डिस्कव्हरी सायन्स सेंटरचे प्रमुख मार्गदर्शक वीरभद्र देशमुख यांनी बोलताना असे सांगितले की हे सायन्स सेंटर मागील 10 वर्षापासून मुलांना विज्ञान विषयी मार्गदर्शन करत आहे व आज पर्यंत या ठिकाणाला जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे .अनेक परदेशी पर्यटक व पाहुण्यांनी सुद्धा या संस्थेला व सेंटरला केवळ भेटच दिली नाही तर आर्थिक स्वरुपात भरघोस अशी मदत सुद्धा केलेली आहे .या केंद्राचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये व प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान व त्यातील प्रयोग समजून घेता यावेत यासाठीच ही सर्व धडपड आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरस्वती विद्यालयाचे योगशिक्षक तथा माहेश्वरी सभा परभणी चे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, विज्ञान शिक्षक राजेश लोंढे, बालासाहेब सातपुते, सचिन जोशी, सीमा साळवे ,भुवनेश्वरी वाघमारे या शिक्षकांनी या क्षेत्रभेटी च्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.