Breaking News

जिंतूर सेलू तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतींना 21 लाखाचा निधी :आ.मेघना बोर्डीकर.

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

प्रदिप कोकडवार :- जिंतूर दि.19 ग्रामपंचायत निवडणूकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक कुस्तीचा आखाडा न बनता ती विकासाची गंगोत्री व्हावी, यासाठी पुढाकार घ्यावा. निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. अशा बिनविरोध येणार्‍या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील
ग्रामपंचायतींना विकासाकरिता प्रत्येकी 21 लाख रूपयाचा शासन निधी देण्यात येईल,अशी घोषणा आमदार सौ.मेघना बोर्डीकर यांनी शनिवारी(दि.19) केली. येत्या 15 जानेवारीला मतदारसंघातील तब्बल 168 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेले 9-10 महिने शेतक-यांसह संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना प्राणासही मुकावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुका आल्यामुळे प्रथेप्रमाणे गावागावांत भांडणतंटे, ईर्ष्या, चढाओढ पहायला मिळते.त्यामुळे कोविड विरोधात लढणारे पोलीस, प्रशासन, वैद्यकीय, आरोग्य कर्मचा-यांवर फार मोठ्या प्रमाणात ताण वाढणार आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ.बोर्डीकर यांनी केले आहे. अशा गावांना राज्यातून आणि विशेष करुन केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याच्या त्या म्हणाल्या. ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा पाया समजल्या जातात. तर ग्रामपंचायत निवडणुकी या लोकशाहीचा पाया समजल्या जातात. आजदेखील राज्यातील विविध गावांमध्ये निवडणुका सोडल्या तर अन्य बाबतीत गट-तट बाजूला ठेवून यात्रा-जत्रा आणि गावाच्या सर्वांगिण विकासाचे उपक्रम राबविले जातात. कोणत्याही निवडणुका आल्या की, विशेषत: ग्रामीण भागात ईर्ष्या, चढाओढ, मी मोठा की तू मोठा असे म्हणत निवडणुकांदरम्यान घमासान घडून धुमश्‍चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते. निवडणुकांमध्ये दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत. त्यामुळे भावकी गावकीत पिढ्यान्पिढ्या संघर्ष सुरु राहतो. त्यामुळे गावच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसतेच. परंतू त्यापेक्षाही गावातील निकोप वातावरण गढूळ होते. निवडणुका या लोकशाहीचा पाया समजल्या जात असल्या तरी त्या निकोप तसेच स्पर्धात्मक होणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळातील निवडणुका पाहिल्या तर जवळपास सर्वच गावांत दोन उभे गट पडलेले दिसून येतात.
यावर्षीच्या सुरुवातीलाच कोरोना या विषाणुचा संसर्ग संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर पसरला. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी देशासह संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन जाहीर करावे लागले. लॉकडाऊन ते अनलॉक या प्रक्रियेमुळे शेतकरी, कष्टकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे. इच्छा असूनही काही प्रमाणात का होईना कोरोनाच्या सुरु असलेल्या काळात जनतेवर मोठ्या प्रमाणावर बंधने आली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. जिंतुर- सेलु तालुक्यातील सुमारे 168 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने हेवे-दावे विरहित, ग्रामस्थांच्या वैचारिक सहकार्यातून बिनविरोध निवडणुका झाल्यास त्याचे चांगले दूरगामी परिणाम दिसणार आहेत. हेवे-दावे विरहित, बिनविरोध निवडणुका विविध गावांतील ग्रामस्थांनी केल्या तर त्या गावांना राज्यातून, विशेषत: केंद्रातून विकासात्मक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटिबद्ध असू असे आ.मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close