*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी* *जिंतूरच्या तिन नवोपक्रमांची निवड*

संपादक :- अकबर सिद्दीकी
जनसमर्थक :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या वतीने 2020 -21 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी जिल्हा स्तरावर नुकतीच नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतून जिंतूर तालुक्यातील तिन उपक्रमांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आल्याची माहिती डायट परभणीच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग उपक्रमशील शिक्षक करीत असतात. त्यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी नवोपक्रम मार्गदर्शन शाळा घेऊन या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. त्यामुळे शाळा बंद असल्या तरीही या स्पर्धेला जिल्हाभरातून शिक्षकांनी चांगला प्रतिसाद देऊन शाळा बंद पण शिक्षण सुरू असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिंतूर तालुक्यातील साखरतळा येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती किरण शेषराव भिसडे यांच्या “सूर्यास्त व सूर्यग्रहण प्रयोग व प्रत्यक्ष सूर्यग्रहण सोहळा” तसेच भिलज येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक प्रकाश बाबुराव डूबे यांच्या “लॉक डाऊन काळात उपक्रम सोडवू, भविष्यात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू” आणि गणपुर येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती रत्नमाला एकनाथ शेळके यांच्या “ऑनलाइन स्पोकन लँग्वेजेस,हिंदी इंग्रजी सोबतच, हसत खेळत शिकूया प्रादेशिक भाषा” या तीनही उपक्रमांची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल डायट चे प्राचार्य सुभाष कांबळे , शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर. उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी संजय ससाने , गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले यांनी अभिनंदन केले तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पाच पैकी तीन नवोपक्रम हे जिंतूरचे असल्यामुळे जिंतूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.