Breaking News

*सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाड्यातील कामे प्राधान्याने केली जातील* – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

  संपादक :- अकबर सिद्दीकी

( जनसमर्थक)        परभणी दि.24,(जिमाका) : मराठवाड्यातील जायकवाडीच्या डावा आणि उजवा कालव्याची संगणकीय रचना आणि अत्याधुनिक नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान व पध्दतीनूसार रचना करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने लवकरात लवकर काम सुरु करण्याचा आमचा मानस आहे. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाड्यात ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील. अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत दिली.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक के.बी.कुलकर्णी, अधिक्षक अभियंता विनय शेटे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जायकवाडीच्या कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे त्या सर्वांची सुधारणा करण्यात येणार असून हे काम सुरुवात ते संपेपर्यंत अतिशय उच्च दर्जाचे करण्यात येईल. मराठवाड्यात आता बऱ्यापैकी जास्तीचा पाऊस पडत असल्याने पाणी वाहुन जाण्यासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असून त्यासाठी प्रथमत: अभ्यास करणे महत्वाचे आहे. मराठवाड्यात जिथे कुठे कामाची आवश्यकता आहे तेथील कामे पुर्ण केली जातील. पालम तालुक्यातील दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी साठ्यापैकी हक्काचा 33 टक्के पाणीसाठा परभणी जिल्ह्यासाठी सदैव राखीव ठेवण्यात यावा असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून चाऱ्यांच्या दुरुस्तीचे स्थानिक पातळीवर करण्यात यावी. शेतकऱ्यांना सेवा व्यवस्थित देण्यासाठी तत्पर राहत असतानाच पाणीपट्टी व पाण्याचे समान वाटप करण्यासाठी तसेच रिक्त पदांमुळे होत असलेल्या दिरंगाईवर तोडगा काढण्यासाठी बाहेरच्या एजन्सीमार्फत कामे मार्गी लावावी असे सांगून जिल्ह्यातील चाऱ्यांची झालेली तुटफुट आणि निर्माण झालेली अडथळ्यांची कामे तात्काळ हाती घेवून तात्काळ दुरुस्तीस सुरुवात करावी असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी निम्न दुधना प्रकल्पाविषयी लोकप्रतिनिधींच्या सुचना विचारात घेवून योग्य ते निर्देश देवून ज्यांना कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यासाठी दिली गेली होती त्या कामांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
सुरुवातीस परभणी जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची थोडक्यात माहिती, पुर्ण झालेल्या प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, बांधकामाधीन प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, प्रस्तावित प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, जिल्ह्यातील प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचन क्षमता, बांधकामाधीन प्रकल्पांची सन 2021-22 मधील उपलब्ध आर्थिक तरतूद व आवश्यक अतिरिक्त निधी, परभणी जिल्हा प्रकल्प पाणीसाठा, परभणी जिल्ह्यातील बांधकामाधीन प्रकल्पांची सद्यस्थिती यात मोठे 3 व लघु 9 प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पाची बांधकामधीन सद्यस्थिती, डावा व उजवा कालव्याची सद्यस्थिती आणि सिंचन पाणी पाळी दर्शविणारे छायाचित्रे, जायकवाडी टप्पा-2 अंतर्गत माजलगाव उजवा कालवा मातीकाम, विष्णुपुरी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत गोदावरी नदीवरील 5 उच्च पातळी बंधारे सद्यस्थिती, बांधकामाधीन लघु प्रकल्प सद्यस्थिती, लघु पाटबंधारे प्रकल्प तसेच परभणी जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित प्रकल्पांची सद्यस्थिती, पुर्ण झालेल्या प्रकल्पाची सद्यस्थिती व छायाचित्र आदिची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी दिली. या बैठकीस महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपकार्यकारी अभियंता प्रताप सोळंके, जलसंपदा विभागाचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

-*-*-*-*-

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close