*जिल्हाधिकारी कार्यालयात थोर, कर्तृत्ववान स्त्री-पुरुष अवतरले*

संपादक :- अकबर सिद्दीकी
परभणी, दि. 18 (जिमाका) :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व चाईल्ड लाईन 1098 आणि बाल कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दि.14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत बालहक्क सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज बालगृहातील तसेच बालगटातील मुले-मुली जिल्हाधिकारी कार्यालयात थोर, कर्तृत्ववान स्त्री-पुरुषांच्या वेशभुषेत आली होती. बालकांना मोकळे वातावरण मिळणे आवश्यक आहे. यामुळे मुलांच्या शैक्षणिक गुणात्मक वाढ होत असते असे सांगत बालकांना चांगले वातावरण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या पिढीतील बालकांना महापुरुषांची आठवण व्हावी व आपल्या जीवनात त्यांचे विचार, तत्वज्ञान अंगीकारुन समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी कार्य करावे. असे मत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात थोर, कर्तृत्ववान स्त्री-पुरुषांच्या वेशभुषेत कार्यालयात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले होते. जिल्हाधिकारी आंचल गोयल या देखील आज इंदिरा गांधीच्या वेशभूषेत आज कार्यालयात आल्या होत्या. तर मिलिंद साळवी यांनी शिवाजी महाराज, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी भगतसिंग, बालगृह अधिक्षक व्ही.पी.नागरे यांनी महात्मा फुले, मिलिंद कांबळे यांनी शाहु महाराज, गजानन पटवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राहुल देशमुख यांनी महात्मा गांधी, माया वाघमारे यांनी राजमाता जिजाऊ, अर्चना मनवतकर यांनी डॉ.आनंदीबाई जोशी, व्ही.एस.नरसीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, संदिप बेनसुरे यांनी राजगुरु, अरुण काटे यांनी जवाहरलाल नेहरु, यांची वेशभुषा केली होती. यावेळी बालकांनी गाणे गावून व त्यांनी केलेल्या थोर समाजसुधारक, इतिहासातील थोर व्यक्ती यांच्या विषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत मुलांना येणाऱ्या अडचणी व बालगृहातील समस्या जाणून घेत संबंधितांना विविध सुचना केल्या. थोर महापुरुषांच्या वेशभुषेप्रमाणेच त्यांचे विचार आपल्या आचरणात आणावेत असे सांगत परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालकांचे विशेष कौतूक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह बाल निरीक्षण गृहातील व महिला व बाल विकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-